राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, आज पार पडलेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ सहभागी झाले होते.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरी झिरवळ अनुपस्थित राहिल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजीनाम्याचा दबाव आहे का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, प्री-कॅबिनेट बैठकीत अशा कोणत्याही प्रकारची अंतर्गत चर्चा झालेली नाही. तसेच, संबंधित प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी झिरवळ यांना योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
तटकरे यांनी पुढे सांगितले की, झिरवळ यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील राजकीय घडामोडी काय वळण घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




