‘गदर २’ आणि ‘संजू’ सारख्या सिनेमांना टाकले मागे
भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची मोठी लाट पाहायला मिळत असून, प्रेक्षकांनी या दुसऱ्या भागाला डोक्यावर घेतले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल ₹६९१.३२ कोटींचे ग्रोस कलेक्शन करून नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, रविवारी एका दिवसात भारतामध्ये या सिनेमाने ₹११४.८५ कोटींची विक्रमी कमाई केली असून, आता हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.
Sacnilk च्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर २’ ने ‘गदर २’ (₹६९१.०८ कोटी), ‘संजू’ आणि ‘बॉर्डर २’ सारख्या दिग्गज चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकत आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. अभिनेता रणवीर सिंहने साकारलेली ‘इंडियन स्पाय’ची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असून आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाने चित्रपटात मोठी रंगत आणली आहे. सध्याच्या वेगवान कमाईमुळे हा चित्रपट येणाऱ्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक जुने विक्रम मोडीत काढेल, अशी चिन्हे दिसत आहेत.




