ओतूर,प्रतिनिधी:दि.२८ एप्रिल ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.२८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोहम जयसिंग नवले ( वय १२ वर्षे ), विघ्नेश महेश पवार ( वय ८ वर्ष ) दोघे रा.बल्लाळवाडी,ता.जुन्नर,जि.पुणे अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बल्लाळवाडी ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,सोहम जयसिंग नवले व विघ्नेश महेश पवार हे दोघे मंगळवारी दुपारी बल्लाळवाडी येथील डॉ.विनोद ढवळे यांच्या शेतातील तळ्याकडे अंघोळीसाठी गेले होते.
सोहम नवले हा शेततळ्यात रस्सीच्या सहाय्याने पोहण्यासाठी गेला असता, रस्सी तुटल्याने तो पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी त्यांचा मित्र विघ्नेश पवार हा गेला असता,तो ही पाण्यात बुडाला.यावेळी त्याच्यासोबत असणारा दुसरा मित्र कार्तिक नवले याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक ग्रामस्थ जमा झाले.या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस आणि रेस्क्यू टीम व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढले आणि पुढिल उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत गोरे व डॉ.वैष्णवी ठिकेकर यांनी तपासणी करून डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले.




