ममता बॅनर्जींच्या लढ्याचा दाखला देत मोदी-शाहांवर बोचरी टीका; मविआच्या उमेदवाराचे सस्पेन्स कायम ठेवत राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देशात लोकशाही नसून ‘निवडणूक आयोगाचा दहशतवाद’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे अडीच लाख निमलष्करी दलाचा वापर करून ममता बॅनर्जींना रोखण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रकार आता इतरत्रही केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “जर मोदीजी जगाचे नेते आहेत, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि पोलीस बळाचा वापर का करावा लागतो?” असा रोकडा सवाल त्यांनी विचारला असून, हा प्रकार म्हणजे पराभवाच्या छायेखाली असलेले सत्ताधारी विजयासाठी करत असलेले उपद्यावप असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही प्रकाश टाकला. “मविआचा एकच उमेदवार असेल आणि त्याचे नाव उद्या सकाळी ११ वाजता विधानभवनाच्या पायऱ्यांवरच स्पष्ट होईल,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन मविआचे नेतृत्व करावे, ही आपली आणि घटक पक्षांची प्रामाणिक इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांबाबत बोलताना त्यांनी याला ‘पक्षफुटी’ ऐवजी ‘डरपोकपणा’ असे संबोधले. दरम्यान, मीरा रोडमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी देशातील बिघडलेल्या धार्मिक वातावरणाला भाजप आणि संघ विचारसरणी जबाबदार असल्याचे सांगत कडाडून टीका केली.




