Thane Water Cut : वाहन धुण्यावर 10 जूनपर्यंत बंदी, ठाण्यात नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

spot_img

राज्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून काही ठिकाणी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. ठाणे शहरात वाढत्या तापमानामुळे जलसाठा झपाट्याने घटत असल्याने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

याअंतर्गत शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे आणि साफसफाईवर 10 जून 2026 पर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. दोन, तीन आणि चारचाकी वाहनांसह इतर वाहनांची धुलाई थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, या नियमाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अपव्यय टाळून पुनर्वापरावर भर द्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

नागरिकांनीही घरगुती पातळीवर पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, जसे की गाड्या किंवा अंगण धुणे टाळणे, नळ उघडे ठेवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे आगामी काळातील पाणीटंचाईचा फटका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात वेगळंच चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अवैध पाणी उपसावर निर्बंध घातले असतानाही अनेक प्रकल्पांतून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. पाटोदा तालुक्यातील भायाळा तलावातून मोटार पंपाद्वारे पाणी काढले जात असल्याने भविष्यात गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ