Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची टी-२० कर्णधारपदावरून गळती निश्चित; खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

spot_img

आयपीएलमधील फ्लॉप शो आणि घसरलेला स्ट्राईक रेट सूर्याच्या अंगलट; नव्या नेतृत्वाचा शोध सुरू

भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या पदावरून हटवले जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सूर्यावर ही वेळ आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, क्रिकेट वर्तुळातील जाणकार आणि निवडकर्ते या निर्णयामुळे आश्चर्यचकित झालेले नाहीत. बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून, आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. या मोठ्या निर्णयापूर्वी निवडकर्त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करूनच हा धाडसी निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

भारतीय संघाने गेल्या काही काळातील ५१ टी-२० सामन्यांपैकी तब्बल ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघाची कामगिरी उत्तम राहिली असली, तरी या काळात कर्णधार सूर्यकुमार यादवची वैयक्तिक कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. या सामन्यांमध्ये सूर्याला केवळ २५.२७ च्या सरासरीने ९३५ धावा करता आल्या असून, त्यात अवघ्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे. इतर खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे सूर्याचे अपयश आजवर झाकले गेले होते. गेल्या वर्षभरात तर त्याची सरासरी घसरून १३.६२ वर आली होती. बीसीसीआयने वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून त्याला कर्णधारपदावर कायम ठेवले होते आणि आयपीएल २०२६ हा त्याच्यासाठी फॉर्ममध्ये परतण्याचा टर्निंग पॉईंट ठरेल अशी आशा होती; पण तिथेही त्याचा फ्लॉप शो कायम राहिला.

निवडकर्त्यांना चोख उत्तर देण्यासाठी सूर्याकडे आयपीएलमध्ये १४ सामन्यांची मोठी संधी होती. मात्र, त्याने १३ डावांमध्ये अवघ्या २०.७६ च्या सरासरीने फक्त २७० धावा केल्या. जे फटके मारून सूर्या चेंडू सहज सीमापार धाडायचा, त्याच फटक्यांवर तो यंदा वारंवार झेलबाद होताना दिसला. गोलंदाजांनी त्याची कमकुवत बाजू अचूक हेरल्याने त्याला धावा करणे कठीण झाले. त्याचे वाढते वय (३५ वर्षे) आणि ढासळलेला फॉर्म पाहता, आगामी २०२८ च्या वर्ल्ड कपचा विचार करून बीसीसीआयने आता भविष्यातील कर्णधार घडवण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्याला केवळ कर्णधारपदावरूनच नाही, तर संघातूनही वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याच्या जागी श्रेयस अय्यर किंवा टिळक वर्मा यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ