Supriya Sule : ‘पुण्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ’; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा, कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

spot_img

विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. शहरातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला.

सुळे म्हणाल्या की, पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आता चिंतेचा विषय बनल्या आहेत. हा केवळ राजकीय मुद्दा नसून प्रत्येक पुणेकराच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे. शहरातील महिला, तरुणी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारीवरूनही त्यांनी सरकारला घेरले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा करत त्यांनी नेमकी खरी परिस्थिती काय आहे, असा सवाल उपस्थित केला. विशेषतः पुण्यात चर्चेत असलेल्या कोयता गँगच्या घटनांचा उल्लेख करत, अशा प्रकारचे व्हिडिओ आणि बातम्या सतत समोर येत असताना प्रशासनाला त्याची दखल का घेतली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय शहरातील भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी, पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्द्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्याचे स्पष्ट करताना सुळे यांनी सांगितले की, बैठकीत निवडणूक रणनीतीसोबतच पुण्याच्या स्थानिक समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका महाविकास आघाडीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या काही उमेदवारी अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या टीकेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ