Maharashtra MLC Election 2026 : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; महायुती विरुद्ध मविआ आमनेसामने, ‘या’ १७ जागांवर रंगणार रणसंग्राम!

spot_img

काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची घोषणा; महायुतीचे शिलेदारही सज्ज, काही जागांवर अद्याप सस्पेन्स कायम

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून, राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आधीच आपले उमेदवार मैदानात उतरवून काहींचे अर्जही दाखल केले असताना, आता विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीनेही (मविआ) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे, या १७ जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसनेही आपल्या पाच प्रमुख उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावतीतून हर्षदीप देशमुख, यवतमाळमधून साहेबराव कांबळे, लातूरमधून महेश देशमुख आणि सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. चंद्रपूर-वर्धा जागेचा निर्णय झाला असला, तरी अहमदनगर, नागपूर आणि भंडारा या तीन महत्त्वाच्या मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काँग्रेसकडून अंतिम टप्प्यात आहेत. या उर्वरित जागांवर काँग्रेस कोणाला संधी देते, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली रणनीती स्पष्ट केली आहे. सांगली-सातारा मतदारसंघातून पक्षाचे दोन उमेदवार, अभय जगताप आणि बाळासाहेब पाटील हे अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, अभय जगताप यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत काहीसा संभ्रम असला, तरी रणनीतीचा भाग म्हणून सध्या दोन्ही उमेदवार अर्ज भरतील आणि नंतर गरज पडल्यास एक उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते.

या निवडणुकीत विविध मतदारसंघांतून अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. संभाव्य आणि अधिकृत उमेदवारांच्या यादीत अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालनामधून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, आणि धारूर-बीड-लातूरमधून बसवराज पाटील नशीब आजमावत आहेत. जळगावमधून नंदकिशोर महाजन, नागपूरमधून राजीव पोतदार, तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून अरुण लखाणी रिंगणात आहेत. भंडारा-गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत आणि सांगली-साताऱ्यातून धैर्यशील कदम निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीतून सईद खान आणि ठाण्यातून रवींद्र फाटक यांच्यात लढत होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणच्या जागेवरून अनिकेत तटकरे नशीब आजमावत आहेत. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी, किरण पांडव आणि सलीम खातून यांच्या नावांची चर्चा असून पुण्यातून विक्रम काकडे संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ