मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली. सरकारी मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवत पालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान परिसरातील सुमारे 50 वर्षे जुना हजरत सय्यद बरकत अली दर्गाही हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. मात्र जागेच्या मालकीबाबत किंवा बांधकामाच्या वैधतेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच परिसरात मोठी हालचाल सुरू होती आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
कायद्याचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पालिका अधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडली. दरम्यान, या परिसरातील बांधकामांविषयी यापूर्वीच प्रश्न उपस्थित झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर येथे अनधिकृत बांधकाम झाल्याच्या चर्चांना अधिक वेग आला होता.
अखेर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत संबंधित बांधकामे हटवली. या कारवाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे आरे कॉलनी परिसरातील अतिक्रमण आणि सरकारी जागांच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




