Thane News : ठाण्यात एफडीएचा मोठा दणका! ११ लाखांचे आंबे आणि साडेचार लाखांचा गुटखा जप्त; ३७ जणांना बेड्या

spot_img

इथिलिन स्प्रे मारून आंबे पिकवणाऱ्यांवर कारवाई; ३१ दुकाने सील, नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर

ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० आणि ३१ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह ठाण्याच्या विविध भागांत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. उन्हाळ्यात आंब्यांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत रासायनिक पद्धतीने आंबे पिकवणाऱ्या आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने थेट धाडी टाकल्या.

या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी आरोग्याला घातक ठरणाऱ्या ‘इथिलिन’ (Ethylene) सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या ३ मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नियमानुसार फळे पिकवण्यासाठी केवळ सुरक्षित अशा इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक असताना, हे व्यापारी थेट फळांवरच रसायनाचा स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. या कारवाईत ११ लाख १२ हजार ८५० रुपये किमतीचा तब्बल ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे आंबे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या तपासणीत ‘कॅल्शियम कार्बाइड’ या अत्यंत घातक रसायनाचा वापर कुठेही आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून २९ ते ३१ मे दरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ३६ दुकानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला असून ४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बेकायदेशीर गुटखा विक्रीप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून ३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गंभीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३१ प्रतिष्ठानांना प्रशासनाने तात्काळ सील ठोकले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ