शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिंदे गटातील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य करत टीका केली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील रिक्षाचालकांना मराठी येणं आवश्यक असल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे. मात्र, याच मुद्द्यावर शिंदे गटातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी मराठी सक्तीबाबत ठाम भूमिका जाहीर करायला हवी. “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणं योग्य नाही. हीच बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी होती. प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या मातृभाषेतच व्यवहार व्हायला हवा, आणि महाराष्ट्रात मराठी अनिवार्य असलीच पाहिजे,” असं त्यांनी ठासून सांगितलं.




