Radhakrishna Vikhe Patil meet Manoj Jarange Patil : विखे पाटील-प्रसाद लाड संभाजीनगरमध्ये; जरांगे पाटील उपोषणावर ठाम, महायुती सरकारची धाकधूक वाढली!

spot_img

मनोज जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सरकारचं ‘मिशन डॅमेज कंट्रोल’; ‘अधिकारी ऐकत नसतील तर गाठ माझ्याशी’, विखे पाटलांचा प्रशासनाला इशारा.

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यामुळे महायुती सरकारची धाकधूक वाढली असून, आंदोलनाची आग शांत करण्यासाठी राज्य सरकारचे दोन महत्त्वाचे दूत मैदानात उतरले आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अंतरवाली सराटीकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. जरांगे यांच्या भेटीआधी विखे पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची आढावा बैठक घेत आहेत. “अनेक ठिकाणी मराठा समाजातील उमेदवारांकडे आवश्यक ती वैधता (Validity) असूनही, स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यांना जात दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत,” अशी कबुली विखे पाटलांनी दिली. या बैठकीत ते अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार असून, प्रशासकीय दिरंगाई दूर करूनच ते आंदोलकांच्या भेटीला जाणार आहेत.

दुसरीकडे, “सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येत असेल तर त्यांचे स्वागत आहे, पण मी माझ्या उपोषणाच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम आहे,” असा थेट पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, “उपोषण करायचं की नाही, हा पाटलांचा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर मुद्द्यांवर आम्ही सकारात्मक चर्चा करू. या चर्चेनंतर त्यांचे पूर्ण समाधान होईल आणि ते उपोषणाचा निर्णय मागे घेतील, असा मला ठाम विश्वास आहे.”

दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनी या दौऱ्याबाबतची अंतर्गत पार्श्वभूमी स्पष्ट केली. “मनोजदादांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मला अत्यंत भावनिक साद घातली होती. त्यांनी स्वतः मला समितीच्या अध्यक्षांना सोबत घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही तातडीने निघालो आहोत. काल विखे पाटील कांद्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर दिल्लीत असल्याने आम्हाला येण्यास एका दिवसाचा उशीर झाला. पण आज पहाटेच आम्ही दोघे मुंबईवरून निघून येथे पोहोचलो आहोत. मनोजदादांनी केलेल्या भावनिक आवाहनाचा आदर करून, मी देखील मराठा समाजाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्यांचा भाऊ म्हणूनच त्यांना आंदोलन मागे घेण्याचे कळकळीचे आवाहन करत आहे,” असे प्रसाद लाड यांनी भावूक होत सांगितले. आता या हाय-व्होल्टेज बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ