Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत

spot_img

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. उपोषण टाळण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारकडून संवादाचा मार्ग स्वीकारण्यात आला असून आज सरकारचं एक शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

या महत्त्वाच्या बैठकीत महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड आणि आमदार बच्चू कडू सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वी चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, बैठकीपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना भावनिक संदेश देत “दादा मी येतोय… शब्द पाळायला येतोय,” असं म्हटलं आहे. तसेच भर उन्हात उपोषण करून प्रकृतीची हानी करून घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं. “मराठा समाजाला तुमची गरज आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या,” अशी विनंती त्यांनी आपल्या संदेशातून केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारसमोर मोठं राजकीय आणि सामाजिक आव्हान उभं राहिलं असून आता सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेतून नेमका काय निर्णय निघतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ