पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी कुंटणखान्यावर मोठी कारवाई करत काही फ्लॅट सीलबंद केल्याची माहिती समोर आली आहे. न्यु वेलकम, बेगम आणि दाणे आळी परिसरातील जुन्या इमारतींमधील फ्लॅट्सचा अनैतिक व्यवसायासाठी वापर होत असल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या तपासादरम्यान या प्रकरणाचा छडा लागला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी कुंटणखाना चालविणे तसेच त्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू असून, या जाळ्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, महिनाभरापूर्वी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या भागात छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या महिला भारतात कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सुमारे एक महिन्यापासून पुण्यात राहून वेश्या व्यवसायातून उदरनिर्वाह करत असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
सदर महिलांकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या अनैतिक धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे शहरातील बेकायदेशीर मानवी वाहतूक आणि अनधिकृत वास्तव्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.




