राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुकतेच मुंबईतील रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्यांनी पुण्यातील आपल्या ‘मोदी बाग’ या निवासस्थानी पवार कुटुंबाची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक अचानक बोलावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत कुटुंबातील प्रमुख सदस्य सहभागी होण्याची शक्यता असून, त्यातून पुढील राजकीय दिशा ठरू शकते, असे संकेत मिळत आहेत.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार आणि पार्थ पवार उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, जय पवार सध्या परदेशात असल्याने ते या बैठकीला अनुपस्थित राहतील, असे समजते.
दरम्यान, 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पवार कुटुंबातील अंतर्गत राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भविष्यातील नेतृत्व आणि उमेदवारीच्या दृष्टीने काही संकेत मिळत असल्याने या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जय पवार यांनी 2029 साली बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते, तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
या पार्श्वभूमीवर 2029 मध्ये बारामतीमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः शरद पवार यांची भूमिका काय असेल आणि ते कोणाला पाठिंबा देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




