“ब्लॅक बॉक्सची माहिती अमेरिकेला पाठवली; पण सीआयडी शब्दांचा खेळ खेळतेय”; चौकशी नव्हे तर तपासाची रोहित पवारांची आक्रमक मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला आज तीन महिने पूर्ण होत असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण दिले आहे. आज पुण्यात सीआयडी (CID) कार्यालयात काही महत्त्वाचे पुरावे सादर करण्यासाठी रोहित पवार आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या अपघाताचा संबंध भोंदू बाबा अशोक खरात आणि बारामतीमधील एका ‘छोट्या नेत्या’शी जोडला आहे. अजित दादांच्या घराजवळ बकरी टांगण्यात आली होती आणि अघोरी पूजा करण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप करत रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, “आम्ही पुरावे देण्यासाठी आलो होतो, मात्र महत्त्वाचे अधिकारी मुंबईत क्रिकेट मॅच पाहायला गेल्याचे समजतेय. कर्नाटक पोलिसांनी दिलेला एफआयआर (FIR) सीआयडीकडे आला आहे, पण ते आता तपासाऐवजी केवळ ‘इन्क्वायरी’चा शब्दांचा खेळ खेळत आहेत.” विमानातील एफडीए (FDA) रेकॉर्ड आणि अमेरिकेच्या एनटीएसबी (NTSB) कंपनीकडून माहिती डाऊनलोड झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, गेल्या वर्षी झालेल्या अपघाताचा रिपोर्ट अद्याप का आला नाही? असा सवाल करत त्यांनी डीजीसीए (DGCA) वरील अविश्वास व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक दावा करताना रोहित पवार म्हणाले की, भोंदू बाबा अशोक खरातच्या बँक खात्यात २७-२८ जानेवारीला अचानक मोठी उलाढाल झाली होती. “खरातने एका शेतकऱ्याला पवार कुटुंबावर मोठा आघात होणार असल्याचे आधीच सांगितले होते. बारामतीतील एक छोटा राजकीय नेता खरातच्या संपर्कात असून त्यानेच या अघोरी पूजा केल्या आहेत. मोठ्या नेत्यांच्या करंगळ्या कापून ही अघोरी विद्या केली जाते का, याचीही आता तपासणी व्हावी,” असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच, अजित पवार गटाच्या नेत्यांनी आणि जय पवार यांनीही या तपासाबाबत रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अर्ज भरला तर त्यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.




