उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे सोमवारी रात्री उज्जैनी एक्सप्रेसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये शंटिंग प्रक्रिया सुरू असताना ट्रेन अचानक रुळावरून घसरली. या अपघातात एक्सप्रेसचे तीन डबे ट्रॅकच्या बाहेर गेले असून त्यातील एक डबा सुमारे 20 फूट उंचीवर धोकादायक स्थितीत लटकलेला दिसून आला. घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. त्या वेळी फक्त लोको पायलट उपस्थित होता. केदारनाथ यात्रेसाठी सध्या उत्तराखंडमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असताना हा प्रकार घडल्याने चिंतेत भर पडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका रुळावरून दुसऱ्या रुळावर ट्रेन हलवताना हा अपघात घडला. घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.




