Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation : फडणवीस सरकारवर विश्वासघाताचा आरोप; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा एल्गार!

spot_img

‘८ महिने झाले, कुणबी प्रमाणपत्रे कुठे आहेत?’ अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर जरांगे पाटलांचे थेट दिल्ली कूच करण्याचे संकेत

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत, समासाची वारंवार फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा हल्लाबोल केला आहे. सरकारकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, त्याच दिवशी संपूर्ण ताकदीनिशी आंदोलन सुरू होईल, असा इशारा देत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.

आठ महिने उलटून गेले तरी मराठा समाजाला अद्याप कुणबी प्रमाणपत्रे का देण्यात आली नाहीत, असा संतप्त सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ‘शिंदे समिती’ आता नवीन रेकॉर्ड शोधण्यात अपयशी ठरत असून तिचे काम जवळपास ठप्प झाल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची गुप्त भेट घेतली होती, त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान सरकारने मागण्या मान्य केल्याचे सांगत जरांगे यांनी “आपण जिंकलो” अशी घोषणा केली होती; परंतु हैदराबाद गॅझेटनुसार केवळ ३०८ नोंदी सापडल्याने प्रत्यक्ष जमिनीवर मराठा समाजाला कोणताही ठोस फायदा झालेला नाही. यामुळे समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी रखडल्याने जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते मुंबईऐवजी थेट ‘दिल्लीकडे कूच’ करण्याची मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ