Eknath Shinde : “आम्ही तोडकाम नाही, तर जोडकाम करतो!”; सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

spot_img

“लोकांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा अजेंडा” – ६ खासदारांनंतर आमदार फुटल्याने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आधी सहा प्रमुख लोकसभा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर, आता मुंबईतील ठाकरे गटाचे खंदे मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्व मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमची संघटना ही शब्दाला आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाला किंमत देणारी संघटना आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोक स्वतःहून प्रेरित होऊन आमच्या पक्षात सामील होत आहेत. नुकताच राज्यातील ६ मोठ्या खासदारांनी आमच्यासोबत येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. खासदार हा काही साधा प्रतिनिधी नसतो, तो २० ते २५ लाख जनतेमधून निवडून येतो. आपण शिवसेना (शिंदे गट) पक्षात का येत आहोत, हे त्या प्रत्येकाने जाहीरपणे सांगितले आहे. जनतेला, मतदारसंघाला न्याय देणे, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि संकट काळात नेत्याने कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच प्रत्येकाची माफक भावना असते आणि ती आम्ही पूर्ण करत आहोत.”

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “नुकतेच नाशिकमधून निवडून आलेले गोकुळ गीते यांनीही आमचे सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे ‘तोडकाम’ करत नाही, तर ‘जोडकाम’ करतो. आम्ही राजकारण तोडायला नाही, तर जुडवायला आलो आहोत; काही लोक फक्त तुडवायला आले आहेत. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणे हा नसून, ज्या जनतेने आम्हाला खुर्चीत बसवले आहे त्यांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा एकमेव ध्यास आहे.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काही लोक पक्ष सोडून गेल्यावर त्यांच्यावर वैयक्तिक टीका आणि उलटसुलट चर्चा करतात. जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत चांगला आणि सोडून गेला की वाईट, अशी ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट’ अशी त्यांची दुटप्पी भूमिका सुरू आहे. आताही काही लोक आमच्यावर टीका करत आहेत, पण मी त्यांच्या विधानांवर बोलून माझा वेळ वाया घालवणार नाही. आम्ही केवळ विकासाचा अजेंडा घेऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे जात आहोत.

“मी मुख्यमंत्री असलो तरी आजही स्वतःला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच पाहतो. हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे. सचिन अहिर यांनी आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण टीम म्हणून काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे आणि मी त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करतो. २०२२ मध्ये जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करण्यासाठी आम्ही उठाव केला, त्यानंतर ३० जून २०२२ रोजीच माझा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला होता. आज योगायोगाने ३० जून आहे, हा एक अद्भुत योगायोग आहे. महायुती सरकारने या अडीच वर्षांत जनतेसाठी केलेली कामे हीच आमची खरी ताकद आहे,” असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ