Jaywant Wadkar : अभिनेते जयवंत वाडकर यांच्या लेकीचा विवाह थाटामाटात संपन्न; कोण आहे स्वामिनीचा नवरा?

spot_img

मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचे वातावरण पाहायला मिळत असून, ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या घरीही आनंदाचे क्षण अवतरले आहेत. 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अतिशय खास आणि पारंपरिक वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

स्वामिनीच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे मित्र तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. हळदीपासून लग्नापर्यंत प्रत्येक सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. स्वामिनीने लग्नासाठी पारंपरिक साडी आणि दागिन्यांचा साज केला होता, तर तिच्या पतीने दाक्षिणात्य शैलीतील लुंगी आणि पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे या लग्नसोहळ्याची विशेष चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे जयवंत वाडकर यांच्या जावयाची. स्वामिनीचा पती वरूण नायर हा मूळचा मल्याळी असून, तो मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माता आहे. ‘मिरारी प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेचा तो संस्थापक आहे. विशेष म्हणजे, त्याने प्लॅनेट मराठीवरील ‘बाबा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी यांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती.

एका मुलाखतीत जयवंत वाडकर यांनी आपल्या जावयाबद्दल बोलताना तो मल्याळी असला तरी स्वामीभक्त असल्याचे सांगितले होते. ही गोष्ट त्यांना विशेष भावल्याचे त्यांनी नमूद केले होते.

गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखणारे स्वामिनी आणि वरूण आता विवाहबंधनात अडकले असून, चाहत्यांकडून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ