सोलापुरात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवरून वातावरण पुन्हा तापले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकार, मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “सरकार सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाचा एकही मूलभूत प्रश्न सोडवलेला नाही. उलट ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचं काम सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
लक्ष्मण हाके यांनी विशेषतः ओबीसी आरक्षण आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं. “राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी किमान ५० टक्के निधी अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात १ टक्क्यांपेक्षाही कमी निधी देण्यात आला,” असा गंभीर दावा त्यांनी केला. सरकारने विविध महामंडळांच्या घोषणा केल्या, पण त्या संस्थांना पुरेसा निधी आणि प्रशासनिक यंत्रणा दिली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही निशाणा साधला. “सरकार काही विशिष्ट मागण्यांना तातडीने प्रतिसाद देतं, पण ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे,” असं ते म्हणाले. यामुळे सामाजिक समतोल बिघडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हाके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “लाड यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच मोठमोठ्या गोष्टी कराव्यात,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच सरकार स्वतःच “सेल्फ गोल” करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आगामी काळात आणखी मोठे खुलासे करणार असल्याचा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला. त्यामुळे राज्यातील आरक्षणाच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.




