IPL 2026 : हार्दिक पांड्याकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या हालचाली

spot_img

खराब फॉर्म, फिटनेस आणि वरिष्ठ खेळाडूंची नाराजी हार्दिकला नडणार!

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा सीझन आता अंतिम टप्प्यात आला असून, ५ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. सतत होणारे पराभव, सुमार क्षेत्ररक्षण आणि खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे मुंबईचा संघ थेट गुणतालिकेत ९ व्या स्थानावर फेकला गेला. या मानहानिकारक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन अत्यंत नाराज असून, याचा सर्वात मोठा फटका कर्णधार हार्दिक पांड्याला बसण्याची शक्यता आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या खळबळजनक वृत्तानुसार, हार्दिक पांड्याकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद लवकरच काढून घेतले जाऊ शकते.

मुंबई इंडियन्सशी संबंधित अत्यंत विश्वसनीय तीन व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. इतकेच नव्हे तर, मुंबई इंडियन्सचा पुढचा नवा कर्णधार कोण असणार? याबाबत फ्रँचायझीमध्ये अंतर्गत चर्चाही सुरू झाली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा संघ थेट नवव्या स्थानावर का घसरला, याचे आत्मपरीक्षण करताना व्यवस्थापनाने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीझनदरम्यानही “टीम मॅनेजमेंट हार्दिकला कर्णधारपदी कायम ठेवण्यास उत्सुक नाही”, असे अनेक संकेत मिळाले होते.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ मध्ये कमालीची निराशा केली. साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी मुंबईने तब्बल १० सामने गमावले. विशेष म्हणजे, या १० पराभवांपैकी ८ पराभव हे थेट हार्दिकच्या कर्णधारपदाखाली झाले होते. आयपीएलच्या इतिहासात मुंबईची एवढी खराब कामगिरी यापूर्वी कधीही झाली नव्हती.

कर्णधारपदाच्या दबावामुळे हार्दिक पांड्याचा वैयक्तिक फॉर्म पार खालावला. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने खेळलेल्या १० सामन्यांत अवघ्या २२.८८ च्या सरासरीने आणि १३८.२५ च्या स्ट्राइक रेटने फक्त २०६ धावा केल्या. गोलंदाजीत तर त्याची कामगिरी अत्यंत वाईट राहिली; त्याने ६४.७५ च्या अत्यंत महागड्या सरासरीने संपूर्ण सीझनमध्ये केवळ ४ बळी घेतले.

सीझन सुरू असल्यापासूनच मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. अनेक रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचे अनेक वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्याच्या निर्णयक्षमतेवर आणि वागणुकीवर तीव्र नाराज होते. अधिकृतपणे फ्रँचायझीने यावर काहीही म्हटले नसले तरी, वरिष्ठ खेळाडूंसोबतचे मतभेद हेच हार्दिकचे कर्णधारपद जाण्याचे मुख्य कारण ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ