Gold Rate Today : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ!

spot_img

अमेरिकेच्या भूमिकेनंतर सोन्यामध्ये १ हजार तर चांदीत २ हजार रुपयांची वाढ

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेसह सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर सोन्याचे भाव कमालीचे घसरले होते, ज्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा बाजारात मोठी गर्दी केली होती. परकीय चलनावरील वाढता दबाव पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही बाजारातील मागणी कमी न झाल्याने केंद्र सरकारने थेट सोन्यावरील आयात कर (इम्पोर्ट ड्युटी) ६ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले.

दरम्यान, आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, सोन्या-चांदीचे दर जरी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च उच्चांकापेक्षा कमी असले, तरी आज मात्र दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. जळगावच्या प्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १ हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रति किलो तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ६२ हजार २२५ रुपये, तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ७८ हजार १०० रुपयांवर पोहोचले आहेत. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, अमेरिकेने इराणला युद्ध संदर्भात तडजोडीसाठी आणखी एक संधी दिल्याचे संकेत मिळाल्यामुळे जागतिक बाजारात हे बदल पाहायला मिळत आहेत.

आज अत्यंत शुभ मानला जाणारा ‘गुरुपुष्यामृत योग’ आहे. या विशेष मुहूर्तावर भारतीय कुटुंबांमध्ये सोने किंवा चांदी खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र, ऐन मुहूर्ताच्या दिवशीच झालेल्या या दरवाढीमुळे पवित्र खरेदीसाठी बाजारात उतरलेल्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाच्या संदर्भात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या घोषणेचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर होताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ