EPFO UAN New Rules : पीएफ खातेदारांनो सावधान! UAN ॲक्टिव्हेशनचा नियम बदलला; आता वेबसाईटवर नाही ‘या’ ॲपवर होणार काम

spot_img

EPFO चा मोठा निर्णय: सुरक्षेसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ बंधनकारक; जाणून घ्या नवीन सोपी प्रक्रिया

कर्मचारी भविष्यनिधी संघटनेने (EPFO) आपल्या युनिफाइड मेंबर पोर्टलला अपग्रेड केल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. आता पीएफ खातेदारांना ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन युएएन (UAN) क्रमांक तयार करता येणार नाही, तसेच तो ॲक्टिव्हेटही करता येणार नाही. ईपीएफओने सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही महत्त्वाच्या सुविधा आता केंद्र सरकारच्या अधिकृत ‘उमंग’ (UMANG) ॲपवर शिफ्ट केल्या आहेत. त्यामुळे आता नवीन आणि जुन्या अशा सर्वच कर्मचाऱ्यांना या कामांसाठी मोबाईल ॲपचाच वापर करावा लागणार आहे.

या बदलासोबतच सुरक्षेचा एक नवीन स्तर जोडण्यात आला आहे. आता युएएन ॲक्टिव्हेशन किंवा नवीन नंबर मिळवण्यासाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ म्हणजेच चेहरा स्कॅन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘UMANG’ ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप उघडल्यानंतर ‘EPFO Services’ मध्ये जाऊन ‘UAN Services Through Face Auth’ अंतर्गत दिलेल्या पर्यायांवर क्लिक करावे लागेल. यानंतर मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चेहरा स्कॅन करून ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येईल. ज्यांना नवीन UAN मिळवायचा आहे, त्यांनाही याच ॲपवर जाऊन ‘UAN Allotment and Activation’ चा पर्याय निवडावा लागेल.

दरम्यान, आपला जुना किंवा हरवलेला UAN नंबर पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक सोपी करण्यात आली आहे. यासाठी खातेदाराला केवळ आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओळखपत्रासोबत निवासाचा पुरावा अपलोड करावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) सबमिट करताच युएएन नंबर मिळून जाईल.

याशिवाय, ईपीएफओ पोर्टलवर ऑनलाईन ‘डेथ क्लेम’ (मृत्यू दावा) दाखल करण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. यासाठी मृत सभासदाच्या वारसांना आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, मृत्यू दाखला (Death Certificate) आणि बँकेची कागदपत्रे पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील. ही पीडीएफ फाईल २ एमबी (2MB) पेक्षा मोठी नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. फाईलची साईझ जास्त असल्यास ती कॉम्प्रेस करून अपलोड करावी लागेल, जेणेकरून क्लेमची प्रक्रिया कोणत्याही अडचणीविना पार पडेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ