Bandra Gareeb Nagar : वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात ८५ टक्के पाडकाम पूर्ण, आज १६ आरोपींना कोर्टात हजर करणार!

spot_img

‘५ व्या आणि ६ व्या’ रेल्वे लाईनचा मार्ग होणार मोकळा.

वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याची मोहीम आज सलग तिसऱ्या दिवशीही अत्यंत कडक सुरक्षेत सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ८५ टक्के अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. काल (दुसऱ्या दिवशी) सायंकाळी येथील काही संतप्त स्थानिकांनी तोडक कारवाईचा निषेध करत पोलिसांवर अचानक दगडफेक केली होती. या हिंसक घटनेनंतर आज संपूर्ण परिसरात कमालीचा तणाव असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलीस, आरपीएफ (RPF), जीआरपी (GRP) आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) तुकड्यांसह १२०० हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

काल झालेल्या बेधडक दगडफेकीत ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलत सुमारे १०० ते १५० जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा (कलम १०९ नुसार) गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये (FIR) १० संशयितांची नावे प्रामुख्याने नोंदवण्यात आली असून, आतापर्यंत १६ जणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व १६ आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखत उरलेले पाडकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी आज घटनास्थळी अधिक प्रमाणात बुलडोझर आणि पोकलन यंत्रे मागवण्यात आली आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी माहिती दिली की, न्यायालयाच्या आदेशानुसार या भागातील एकूण ५०० बेकायदेशीर बांधकामे हटवली जात आहेत. बेघर झालेल्या स्थानिक रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. ही जागा रिकामी झाल्यामुळे वांद्रे टर्मिनसच्या विस्तारीकरणाला गती मिळेल. तसेच ५ व्या आणि ६ व्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन भविष्यात लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ