मलेशियात पाम तेलाचा दर ४,६०० रिंग्गित प्रति टनावर; सोयाबीन तेलाच्या दरवाढीमुळे पाम तेलाची मागणी वाढली, जून महिन्यातही किंमती भडकण्याची शक्यता
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे लवकरच सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बायोफ्युएलची (जैवइंधन) मागणी झपाट्याने वाढल्यामुळे पाम तेलाच्या (Palm Oil) किंमतींनी रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील हा सर्वोच्च दर ठरला असून, मलेशियाच्या बाजारात पाम तेलाचा भाव थेट ४,६०० रिंग्गित प्रति टन इतका झाला आहे. वायदे बाजारात सध्या व्हेजिटेबल ऑईल आणि खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली जात असून, आगामी जून महिन्यातही ही दरवाढ अशीच सुरू राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाम तेलाच्या जागतिक पुरवठ्यात मलेशिया आणि इंडोनेशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात पाम तेलाच्या किंमतींनी ४,८०० रिंग्गित प्रति टनाचा टप्पा गाठला होता, जो या वर्षातील सर्वोच्च भाव होता. त्यानंतर दरांमध्ये काहीशी घसरण झाली असली, तरी आता बाजारात मागणी प्रचंड आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने खाद्यतेल पुन्हा महागले आहे.
मलेशिया पाम ऑईल एलायन्स आणि मलेशियन पाम ऑईल बोर्डाच्या (MPOB) ताज्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात कच्च्या पाम तेलाच्या किंमती सरासरी ४,४०० रिंग्गित प्रति टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मार्च ते ऑक्टोबर हा कालावधी पाम तेलाच्या उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो; कारण या काळात पामच्या फळांमधून सर्वाधिक तेल काढले जाते. मात्र, यंदा अनुकूल काळ असूनही एप्रिल महिन्यात मलेशियातील पाम तेलाच्या साठ्यात अतिशय किरकोळ वाढ झाली असून, हा साठा अवघा २.३१ दशलक्ष टनांवरच मर्यादित राहिला आहे. साठ्यातील या कमतरतेमुळे पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
या जागतिक दरवाढीमागे अमेरिकेची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. इराणसह अनेक देशांच्या मते, अमेरिकेच्या भूमिकेमुळे जगभरात इंधनाची अस्थिरता निर्माण झाली असून पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीचे दर भडकले आहेत. आता या धोरणांचा फटका खाद्यतेलालाही बसला आहे. अमेरिकेत बायोफ्युएल क्षेत्रात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढल्याने युरोपमध्ये सोयाबीन तेलाच्या किंमतींनी नोव्हेंबर २०२२ नंतरचा सर्वोच्च स्तर गाठला आहे. जगभरात सोयाबीन तेल महागल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पाम तेलाची मागणी अचानक वाढली, परंतु दुसरीकडे उत्पादन कमी असल्याने पाम तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मलेशियाने २५.५ टक्के वाढीसह तब्बल ५.३८ दशलक्ष टन पाम तेलाची निर्यात केली आहे, जी २०१९ नंतरची सर्वात मोठी निर्यात आहे. मात्र, एप्रिल महिन्यात या निर्यातीत घट झाली असून, जोपर्यंत पाम तेलाचे उत्पादन पुन्हा वाढत नाही, तोपर्यंत जागतिक बाजारातील या वाढत्या किंमती कमी होण्याची शक्यता धूसर आहे.




