Face Pack Tips : स्वयंपाकघरातील ‘या’ डाळीचा फेसपॅक देईल पार्लरसारखा ग्लो

spot_img

उष्णता, धूळ आणि टॅनिंगच्या समस्येवर मसूर डाळीचा घरगुती उपाय; डाग विरघळवून त्वचा बनेल मऊ आणि चमकदार

उन्हाळ्याच्या दिवसांत कडक ऊन, वाढते प्रदूषण आणि घामामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. त्वचा निस्तेज आणि काळी पडल्यामुळे अनेक जण महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र, जर तुम्ही सुरक्षित, स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधत असाल, तर तुमच्या स्वयंपाकघरात असलेली मसूर डाळ हा एक उत्तम पर्याय आहे. केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठीही मसूर डाळ अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेले घटक त्वचेच्या बहुतांश समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतात. मसूर डाळीचे पीठ हे एक उत्तम ‘नॅशनल एक्सफोलिएटर’ (त्वचा स्वच्छ करणारे साधन) म्हणून काम करते, जे त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढून टाकून चेहरा आतून स्वच्छ आणि मऊ बनवते.

उन्हामुळे चेहऱ्यावर टॅनिंग झाले असल्यास आणि त्वचेचा रंग बदलला असल्यास मसूर डाळीचा विशेष पॅक तयार करता येतो. यासाठी डाळीच्या पिठात १ चमचा दही, चिमूटभर हळद, थोडे मध आणि टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवावी. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटांनी गुलाबपाणी किंवा दुधाने हलका मसाज करून चेहरा धुवावा. यामुळे टॅनिंग तर दूर होतेच, पण त्वचेला योग्य ओलावाही मिळतो. चांगल्या परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. तसेच, बाजारातील केमिकलचे स्क्रब वापरण्याऐवजी मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ती वाटून त्यात कच्चे दूध मिसळून चेहरा, हात आणि पायांवर ८-१० मिनिटे लावावी. त्यानंतर दुधाचा हात लावून गोलाकार मसाज केल्यास त्वचा कमालीची मऊ आणि उजळ होते.

चेहऱ्यावरील जिद्दी काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मसूर डाळीच्या पेस्टमध्ये काकडीचा रस, लिंबाच्या रसाचे काही थेंब, दही आणि थोडे गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावे. त्वचा कोरडी असल्यास या मिश्रणात मध किंवा दुधाची साय (क्रीम) आवर्जून घालावी. यामुळे चेहऱ्याची कांती सुधारते. मात्र, मसूर डाळ ही नैसर्गिक स्क्रबसारखी काम करत असल्यामुळे तिचा वापर रोज करू नये. आठवड्यातून १ ते २ वेळा आणि त्वचा जास्त काळवंडली असल्यास जास्तीत जास्त ३ वेळा हा पॅक लावणे पुरेसे ठरते. मुख्य म्हणजे, ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील (Sensitive Skin) आहे, त्यांनी कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर किंवा कानामागे ‘पॅच टेस्ट’ नक्की करून घ्यावी.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ