कृत्रिम बुद्धिमत्तेवरील व्याख्यानादरम्यान एका महिलेने देशातील असहिष्णुतेवर विचारला प्रश्न; आयोजकांनी रोखल्याने सभागृहात तणाव
ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या व्याख्यानादरम्यान काही उपस्थितांनी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. ४ जून रोजी आयोजित या विशेष कार्यक्रमात सरन्यायाधीश ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. भाषण संपल्यानंतर सुरू झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एका महिलेने मुख्य विषयाऐवजी भारतातील कथित असहिष्णुता, मतभेद आणि लोकशाहीवरील दबावाचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यावरून चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित महिलेने देशातील वाढत्या सामाजिक तेढीचा दाखला देत सरन्यायाधीशांना त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘पॅरासाईट’ (परजीवी) या वादग्रस्त वक्तव्याची थेट आठवण करून दिली व त्यावर सवाल उपस्थित केला. मात्र, हा प्रश्न मूळ विषयाशी सुसंगत नसल्याचे सांगत आयोजकांनी तात्काळ हस्तक्षेप केला. मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक प्रश्नांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत आयोजकांनी त्या महिलेला रोखले, ज्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सर्व प्रकारानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने अधिकृत पत्रक काढून या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि बौद्धिक चर्चा सत्रात अशा प्रकारे अडथळा आणणे अत्यंत अयोग्य असून, हे सार्वजनिक ठिकाणी पाळायच्या शिष्टाचाराचे आणि वर्तनाच्या मर्यादेचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत उच्चायुक्तालयाने संबंधितांना फटकारले आहे. लोकशाही देशात मतप्रवाह किंवा विचार भिन्न असणे स्वाभाविक असले, तरीही ते व्यक्त करण्याची पद्धत सभ्य, शालीन आणि आदरयुक्त असायला हवी. संयुक्त राष्ट्र किंवा नामांकित विद्यापीठांसारख्या सार्वजनिक व्यासपीठांवर संवादाची एक ठराविक आचारसंहिता असते आणि तिचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गोंधळ घालून कार्यक्रमात व्यत्यय आणणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नक्कीच नाही, अशी कडक टिप्पणीही उच्चायुक्तालयाने केली आहे.




