Amjad Khan : ३४ वर्षांनंतर अमजद खान यांच्या मुलाने केला शेवटच्या रात्रीचा खुलासा!

spot_img

‘शोले’ चित्रपटातील विलेन खऱ्या आयुष्यात होता अमिताभ बच्चन यांचा जिवलग मित्र; हृदयविकाराच्या धक्क्याने अभिनेत्याचे झाले होते अकाली निधन

बॉलिवूडच्या इतिहासात ‘शोले’ सिनेमातील ‘गब्बर सिंग’ची भूमिका अमर करणारे दिग्गज अभिनेते अमजद खान यांनी आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवला. पडद्यावर जरी ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत क्रूर खलनायकाच्या भूमिकेत दिसले असले, तरी खऱ्या आयुष्यात मात्र या ‘जय आणि गब्बर’मध्ये अत्यंत घट्ट आणि जिवाभावाची मैत्री होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अमजद खान यांचे सुपुत्र शादाब खान यांनी आपल्या वडिलांच्या आयुष्यातील तो भयानक अपघात, अमिताभ बच्चन यांनी केलेली मदत आणि वडिलांच्या निधनाची ती काळी रात्र याबद्दल तब्बल ३४ वर्षांनंतर अनेक भावूक आठवणींना उजाळा दिला आहे.

अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’ व्यतिरिक्त ‘याराना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘लावारिस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. शादाब यांनी सांगितले की, १९७६ मध्ये एका भीषण अपघातात अमजद खान मरता-मरता वाचले होते. या अपघातात त्यांच्या बरगड्या तुटल्या होत्या, फुफ्फुसाला गंभीर इजा झाली होती आणि ते कोमात गेले होते. या अत्यंत कठीण काळात अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खान परिवाराला खूप मोठा आधार दिला आणि ढाल बनून उभे राहिले. अपघातानंतर सुरू असलेल्या जड औषधोपचारांमुळे अमजद खान यांचे वजन वेगाने वाढले, ज्याचा परिणाम पुढे त्यांच्या आरोग्यावर झाला. अखेर २७ जुलै १९९२ रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.

वडिलांच्या निधनाच्या त्या शेवटच्या रात्रीची आठवण सांगताना शादाब यांचे डोळे पाणवले. ते म्हणाले, “मी जेव्हा घरी आलो, तेव्हा आईने मला सांगितले की बाबा झोपेतून उठत नाहीयेत. मी जवळ जाऊन पाहिले तर त्यांचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. डॉक्टरांनी मला तातडीने एक इमर्जन्सी इंजेक्शन आणायला सांगितले. मी वेड्यासारखी गाडी पळवून ते इंजेक्शन घेऊन आलो, पण दुर्दैवाने मला काही सेकंदांचा उशीर झाला होता. बाबा आम्हाला सोडून गेले होते. त्या दुःखाच्या भरात मी प्रचंड हताश झालो होतो, मी घरातील क्रॉकरी तोडली, भिंतीवर हात आपटले आणि बाबांच्या एका मित्रालाही धक्का दिला.” पडद्यावर आपल्या आवाजाने दहशत निर्माण करणाऱ्या गब्बरच्या खऱ्या आयुष्यातील हा दुःखाद अंत आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून जातो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ