Adhik Maas Special : पंतप्रधानांचे काटकसरीचे आवाहन बाजूला; कोल्हापुरी सासर्‍याने जावयासाठी बनवली ४.५ लाखांची ‘चांदीची चप्पल’

spot_img

अधिक मासा निमित्त कोल्हापूरकरांचा अनोखा ‘नाद’; दीड किलो चांदी वापरून परदेशातील जावयासाठी खास भेट

आखाती देशांमधील वाढता युद्धजन्य तणाव आणि सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना आर्थिक काटकसर करण्याचे आवाहन केले होते. देशातील परकीय चलन सुरक्षित राहावे यासाठी गरज नसताना सोने-चांदी खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलची बचत करा आणि परदेश प्रवास टाळा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला होता. या आवाहनामुळे सराफा बाजारपेठेत मंदीचे सावट येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ‘कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही’ या उक्तीप्रमाणे कोल्हापुरात या आवाहनाच्या अगदी विपरीत आणि थक्क करणारी घटना समोर आली असून, मंदीची भीती पूर्णपणे अनाठायी ठरली आहे.

कालपासून हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा ‘अधिक मास’ (धोंड्याचा महिना) सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये सासरच्या मंडळींकडून जावयाला चांदीच्या वस्तू किंवा दागिने मान-पान म्हणून देण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचे औचित्य साधत कोल्हापुरातील एका हौशी सासर्‍याने आपल्या जावयासाठी साधीसुधी नव्हे, तर चक्क चांदीची अस्सल ‘कोल्हापुरी चप्पल’ बनवून घेतली आहे. तब्बल दीड किलो चांदीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या राजेशाही चपलेची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये एवढी आहे. या अनोख्या आणि मौल्यवान भेटीची चर्चा आता केवळ कोल्हापुरातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

ही कलाकृती कोल्हापुरातील प्रसिद्ध कारागीर विक्रांत माळी यांनी साकारली आहे. त्यांनी सुरुवातीला लेदरची मूळ कोल्हापुरी चप्पल समोर ठेवून, तिच्या प्रत्येक भागाचे हुबेहूब नक्षीकाम चांदीमध्ये तयार केले. तब्बल आठ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ही देखणी चप्पल पूर्ण करण्यात आली. संबंधित सासर्‍यांचा जावई सध्या नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक आहे. तो सात समुद्रापार राहत असला तरी त्याला आपल्या कोल्हापूरच्या मातीची आणि संस्कृतीची आठवण कायम राहावी, या उद्देशाने ही खास चांदीची चप्पल बनवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या अनोख्या चपलेची क्रेझ पाहून कोल्हापुरातील इतरही काही हौशी सासर्‍यांनी आपल्या जावयांना खूश करण्यासाठी चांदीच्या विविध वस्तू आणि दागिने बनवण्याची लगबग सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ