अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर संशयाचे सावट; बजरंग सोनवणेंकडून सखोल तपासाची मागणी
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर विविध तर्कवितर्क सुरू असतानाच खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटनेबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानात स्फोटक होते का, याची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमानात एकूण सहा जण होते, मात्र घटनास्थळी पाच मृतदेहच सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत सोनवणे यांनी तपास अधिक पारदर्शक करण्याची मागणी केली. अजित पवार घरातून निघतानाचे तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना सोनवणे म्हणाले की, अजित पवार यांचा त्यांच्या राजकीय जडणघडणीत मोठा वाटा होता. 1999 पासून त्यांचे निकटचे संबंध होते आणि ते त्यांचे राजकीय मार्गदर्शक होते. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शोकसागरात आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल आणि एका वर्षात ते पूर्ण करून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची ही वेळ नसल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बोलणे टाळले. दहा दिवसांच्या दुखवट्यामुळे माध्यमांशी संवाद साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या निर्णायक टप्प्यावर दादांचे जाणे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अपघाताच्या दिवशी सकाळपासूनचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, पायलटची माहिती आणि विमान हवेतच का स्फोटक झाले, यासह संपूर्ण तपास अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.




