spot_img

Amit Shah On Piyush Goyal : ज्यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही ते… अमित शहांनी गोयल यांना फटकारलं

spot_img

प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणायची चूक केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना महागात पडल्याचं बोललं जातंय. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी त्यांना चांगलंच फटकारल्याची माहिती मिळत आहे. अमित शाहांनी यावरुन नाराजी व्यक्त केल्याची माहितीदेखील समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून ही माहिती दिल्याचं बोलल जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सगळी सूत्रं कुणाच्या हाती जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चादेखील सुरू होती. त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यावर भाष्यदेखील केलं होतं. एका खासगी चॅनलला मुलाखत देताना पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं सांगितलं होतं.

एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे हाती द्या अशी मागणी होत होती. तर दुसरीकडे पियुष गोयल यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर आता जोरदार टीका सुरू झाली. स्वतः प्रफुल पटेल यांनी यावर नाराजी व्यक्त करत तसा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती माध्यमांना दिली.

याच मुद्द्यावरून भाजपचा राष्ट्रवादीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये हस्तक्षेप होतोय अशी शंकाही उपस्थित होत होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावरुन नाराजी व्यक्त करत पियुष गोयल यांना फटकारल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र पियुष गोयल यांनी या आधीच त्यांच्या वक्तव्यावरुन माफी मागितली आहे. दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराने आपल्याला चुकीची माहिती दिल्याने आपल्याकडून हे वक्तव्य झालं असं म्हणत त्यांनी माफी मागितली.

याच दरम्यान प्रफुल पटेल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली. या दोन्ही नेत्यांशी प्रफुल पटेल यांनी सहा ते सात मिनिटे चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र अद्याप समोर आला नाही.

ज्यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, ते आमच्या पक्षाबद्दल बोलतात, अशी टीका राष्ट्रवादीबाबत बोलणाऱ्यांवर प्रफुल पटेल यांनी स्वतः केली आहे. विधिमंडळाचा नेता कोणाला निवडावा हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे असेही पटेल म्हणाले. तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अजितदादानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाकडे जाणार याबाबत प्रक्रिया पार पडत असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय योग्य वेळी होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितल. विलीनीकरांच्या मुद्द्यावर उत्तर देताना, आमच्यासमोर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ