spot_img

Sunetra Pawar Guardian Minister : सुनेत्रा पवारांकडे सत्तेची सूत्रे अधिक घट्ट उपमुख्यमंत्रिपदानंतर बीड पुण्याचे पालकमंत्रिपदही मिळाले

spot_img

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; राष्ट्रीय अध्यक्षपदावर अद्याप सस्पेन्स कायम

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडत आहेत. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून नुकताच त्यांचा शपथविधी पार पडला. आता या जबाबदारीत आणखी भर पडली असून, सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत सरकारी आदेशही जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. त्या काळात ही जबाबदारी कोणाला मिळणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अजित पवार यांनी ही जबाबदारी स्वतःकडेच ठेवली होती. त्यांच्या निधनानंतर आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्थिरतेचे वातावरण आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा अद्याप रिक्त असून, या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांची निवड होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम देत, “राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाचीही निवड झालेली नाही आणि मी स्वतः या शर्यतीत नाही,” असे स्पष्ट केले आहे.

यामुळे आता राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबतचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या जागेवर कोण जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का? आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे नेमकी कोणाकडे जाणार? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

अशातच पक्षातील काही नेते सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, यासाठी आग्रह धरू शकतात, अशीही चर्चा रंगू लागली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते मोठे राजकीय निर्णय घेतले जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ