छत्रपती संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठा धोका टळला
छत्रपती संभाजीनगर येथे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड आढळून आला. पंकजा मुंडे या आज प्रचारासाठी हेलिकॉप्टरने लातूरला जाणार होत्या. मात्र टेक ऑफ होण्याआधीच पायलटने हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याची माहिती दिल्याने संभाव्य अनर्थ टळला.
या घटनेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी सकाळी साडेदहा वाजता निघणार होते. हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी तयार होते, पण मला कळवण्यात आले की मी वापरत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या आहे. खरं सांगायचं तर कालपासूनच मला हे हेलिकॉप्टर जुने असल्याची जाणीव होत होती. मात्र तांत्रिक बाबींमध्ये मी फारशी खोलात जात नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.”
हेलिकॉप्टर प्रवासाबाबत बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “मी जेव्हा हेलिकॉप्टरने प्रवास करते, तेव्हा माझी आई देव पाण्यात ठेवून बसते. म्हणजे सतत फोन करून विचारते – लँड झाली का, टेक ऑफ झाली का? अलीकडे घडलेल्या विमान अपघातांमुळे सर्वांच्याच मनात भीती आणि तणाव आहे,” असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, “बारामतीतील विमान अपघातानंतर अनेक कार्यकर्त्यांचे संदेश आले की ताई, हेलिकॉप्टरचा प्रवास टाळा. मात्र मला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच स्पष्ट सांगण्यात आले होते की यामध्ये काहीतरी बिघाड आहे आणि ते बदलावे लागेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र आजच्या शेवटच्या दोन सभा कदाचित रद्द होतील.”
हेलिकॉप्टर लँडिंगवेळी भीती वाटते का, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “अजितदादांचा अपघात आणि त्यात त्यांचे निधन झाल्यापासून मी कायम विचार करते की त्या क्षणी विमानातील लोकांवर काय बीतले असेल. किती भीषण भीती आणि वेदना त्यांनी अनुभवल्या असतील. माझा स्वभाव आहे प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करण्याचा. त्या घटनेनंतर आमचं संपूर्ण कुटुंब अजूनही व्यथित आहे.”




