spot_img

Vijay Wadettiwar : दोन पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणूनच सगळं घडवलं गेलं? विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

spot_img

अजित पवार अपघात प्रकरणावर राजकीय वादळ; शपथविधीवरून कटाचा संशय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या या भीषण अपघातात सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी समोर आली.

या घटनेनंतर अजित पवार यांचा तेरावा होण्याआधीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, या निर्णयाची आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असून काहींनी थेट कटाचा आरोपही केला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता या अपघाताची चौकशी करण्यासाठी सीआयडीची स्थापना करण्यात आली आहे.

या संपूर्ण घटनेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, दोन राजकीय पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून कुठेतरी हा डाव रचण्यात आला असून, त्यातूनच ही घटना घडली असावी. तसेच, सुनेत्रा पवार यांनी इतक्या घाईत शपथ का घेतली, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असा आरोपही त्यांनी केला.

वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नसताना तेराव्यानंतर शपथविधी घेता आला असता. मात्र तसे न करता परंपरा आणि संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. राजकारण आता अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ दिशेने जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत, शपथविधीबाबत आधीच चर्चा झाली होती, हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. एकूणच या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ