spot_img

Ajit Pawar Plane Crash : ‘कटाचा आरोप पुराव्यांशिवाय अशक्य’ उज्ज्वल निकम यांनी दादांच्या विमान आघातावर दिली प्रतिक्रिया

spot_img

विमान अपघात आणि जस्टिस लोया प्रकरणावर तथ्य मांडत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर साधला निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या अपघातामागे घातपात असल्याचा संशय काही नेत्यांकडून व्यक्त केला जात असतानाच, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी या आरोपांवर ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात कोणताही कट असल्याचे दावे तथ्यांच्या आधारे फेटाळून लावले आहेत.

उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की, विमान प्रवासाशी संबंधित प्रत्येक हालचाल आणि नोंदी अधिकृत यंत्रणांकडे उपलब्ध असतात. खासगी विमान असले तरी त्याची संपूर्ण माहिती विमान प्राधिकरणाकडे नोंदवली जाते. मात्र, अपघातग्रस्त विमानात सहा प्रवासी होते, असा दावा करणारा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्यामुळे आग लागल्यानंतर मृतदेह गंभीररीत्या जळाले होते. या पार्श्वभूमीवर केवळ संशयाच्या आधारे कटाचा आरोप करणे चुकीचे असून, अशा गंभीर प्रकरणात ठोस पुरावे आवश्यक असतात, असेही निकम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. जस्टिस लोया नागपूरमध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते आणि त्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या न्यायाधीशांशी आपण स्वतः संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट असून, या संवेदनशील विषयावर राजकारण करणे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार बुधवारी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीच्या सभेसाठी रवाना झाले होते. बारामती विमानतळाजवळ पोहोचल्यानंतर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती. सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक असलेली किमान ५ किलोमीटर दृश्यमानता अपघाताच्या वेळी केवळ ३ किलोमीटर इतकी होती. त्यामुळे वैमानिकाने गो-अराउंड करत विमान पुन्हा हवेत वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेनंतर विमान कंपनीसह बारामती विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ