फडणवीस–राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीनंतर तर्क-वितर्क; अनिल देशमुखांचा संयमाचा सूर
दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अजित पवारांकडे असलेली सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच ठेवण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आल्याचे समजते. अजित पवार यांच्या खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर सांगितले.
दरम्यान, या घडामोडींवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावला आहे. कालच त्यांचा अंत्यविधी पार पडला असून, अशा वेळी मंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होणं वेदनादायक आहे,” असे देशमुख म्हणाले.
पवार कुटुंबीय येत्या एक-दोन दिवसांत एकत्र बसून याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावीत, ही शेवटपर्यंतची मनापासूनची इच्छा होती, असे सांगत देशमुख यांनी त्या इच्छेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
“महापालिका निवडणुकांनंतर एकत्र येण्याचा विचार होता, मात्र जिल्हा परिषद निवडणुकांमुळे तो पुढे गेला. तरीही एकत्रिकरणाची कल्पना अजितदादांची अंतिम इच्छा होती,” असे देशमुख म्हणाले. सध्या कोणतेही निर्णय घाईने न घेता संयम बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.




