शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe) यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते. कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्याने रमेश तिखे यांची तब्येत खालावली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दबावामुळे रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरबाजीच्या प्रकरणात रमेश तिखे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिखे यांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर काल घडलेल्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. ठाकरे गटाने आरोप केला आहे की, पोलिसांनी टाकलेल्या मानसिक दबावामुळेच रमेश तिखे यांचा मृत्यू झाला. पोस्टर प्रकरणात पोलिसांनी अनावश्यकपणे टिके यांना वारंवार बोलावून त्रास दिला. यामुळेच ते मानसिक तणावात होते आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचागंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.




