बालपणीच्या गैरवर्तनाच्या आठवणी, सुरक्षिततेचा संघर्ष आणि 15 वर्षांनंतर व्यक्त झालेली वेदना
2001 साली ‘मिसेस वर्ल्ड’चा मान पटकावणाऱ्या अदिती गोवित्रीकर (Aditi Govitrikar) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अतिशय वेदनादायक अनुभवांवर उघडपणे भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी बालपणी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनांमुळे मानसिक पातळीवर कसा संघर्ष करावा लागला, याची प्रामाणिक कबुली दिली.
अदितीने सांगितलं की, मुंबईपेक्षा पनवेलमध्येच तिला अधिक त्रासदायक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. अवघ्या सहा-सात वर्षांची असताना तिच्यासोबत या घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यातील एक व्यक्ती तिच्या वडिलांचा परिचित होता, तर दुसरी घटना एका अनोळखी व्यक्तीशी संबंधित होती. त्या वयात नेमकं काय घडलं आहे, याची जाणीव तिला पूर्णपणे नव्हती, मात्र त्याचा मानसिक धक्का फार खोलवर बसला.
तिने आपल्या कॉलेजच्या दिवसांतील अनुभवही शेअर केले. बारावीच्या काळात दादरला क्लासेससाठी बसने प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ती दोन्ही बाजूंना मोठ्या पिशव्या ठेवायची. पिशव्यांमधील जड पुस्तकं हीच तिची ढाल होती. गर्दीत कुणाचा स्पर्श होऊ नये म्हणून ती सतत सावध राहत होती.
अदितीने पुढे सांगितलं की, अत्याचार बहुतेक वेळा ओळखीच्या लोकांकडूनच होतात, हा कटू अनुभव तिलाही आला. या सगळ्या घटनांबद्दल बोलण्याची ताकद तिला तब्बल 15 वर्षांनंतर मिळाली. आजही सार्वजनिक ठिकाणी कोणी अचानक जवळ आलं, तर तिचं शरीर आपोआप प्रतिक्रिया देतं. मात्र आता ती या सगळ्याला शांतपणे आणि ठामपणे सामोरं जात असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. तिच्या या कबुलीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.




