बांगलादेश 2026 टी-20 वर्ल्ड कपमधून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. आयसीसी (ICC) ने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश झाल्याची पुष्टी केली आहे. आयसीसीने बांगलादेशला एका पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. बांगलादेशला वगळल्यानंतर, स्कॉटलंडला 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आले आहे. स्कॉटलंडचा समावेश ग्रुप सी मध्ये करण्यात आला आहे, जिथे ते इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली या टीमविरुद्ध खेळतील.
हा संपूर्ण वाद आयपीएल लिलावानंतर सुरू झाला. कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना टीममध्ये सामील केले. पण, बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या वृत्तांमुळे भारतात याला विरोध झाला. त्यानंतर, बीसीसीआयने रहमानला आयपीएलमधून बाहेर केले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बांगलादेश बोर्ड संतप्त झाले आणि त्यांनी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून म्हटले की ते भारतात त्यांचे सामने खेळणार नाहीत. त्यांनी त्यांचे सामने श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये हलवण्याची मागणी केली.
बांगलादेशने असा युक्तिवाद केला की त्यांच्या खेळाडूंची सुरक्षितता भारतात धोक्यात येऊ शकते. पण, आयसीसीने त्यांच्या सुरक्षा अहवालात कोणताही संभाव्य धोका नाकारला. शेवटी, आयसीसीने स्पष्ट केले की बांगलादेशला भारतात सामने खेळावे लागतील. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना काढून टाकले जाईल. बांगलादेशने भारतात न खेळण्याची भूमिका कायम ठेवली, तेव्हा आयसीसीने बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर करत स्कॉटलंडचा संधी दिली आहे.




