ईदच्या बकऱ्यांच्या संख्येवर नेटकऱ्यांचे प्रश्न, आकडेवारी पाहता डायलॉग केवळ सिनेमॅटिक ठरतो
सनी देओलचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॉर्डर 2’ (Boarder 2) सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ॲडव्हान्स बुकिंगही वेगाने सुरू आहे. मात्र ट्रेलरमधील एका डायलॉगने सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या संवादावरून केवळ चाहत्यांमध्येच नव्हे, तर नेटकऱ्यांमध्येही वाद आणि प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे.
सनी देओलचा ट्रेलरमधील संवाद “जितने तुम्हारे पाकिस्तान में लोक नहीं, उतने हमारे हिंदुस्तान में ईद पर बकरे कटते है” हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या विधानावर अनेकांनी वास्तव तपासण्याचा प्रयत्न सुरू केला असून, खरंच भारतात ईदला इतक्या मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारी पातळीवर ईदच्या दिवशी नेमके किती प्राणी कापले जातात, याची थेट आकडेवारी जाहीर केली जात नसली तरी, प्राण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत उपलब्ध असलेली माहिती काही प्रमाणात वास्तव दाखवते. मुंबई महानगरपालिकेने 2023 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देवनार कत्तलखान्यात अवघ्या एका आठवड्यात सुमारे 1 लाख 68 हजार शेळ्या आणि मेंढ्यांची विक्री झाली होती. याच काळात देशातील विविध भागांतून 1 लाख 77 हजारांहून अधिक प्राणी विक्रीसाठी आणले गेले होते, त्यापैकी बहुतांश प्राणी विकले गेले.
मुंबईतील देवनार ही आशियातील सर्वात मोठ्या कत्तलखान्यांपैकी एक मानली जाते. ईद-उल-अधाच्या आधी येथे दरवर्षी लाखो प्राणी आणले जातात. मुंबईपुरतेच नव्हे, तर उत्तर प्रदेशसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ईदच्या काळात बकऱ्यांचे मोठे बाजार भरतात. लखनौमधील डुबग्गा, मौलवीगंज, लेमन पार्क, हार्डिंग ब्रिज यांसारख्या ठिकाणी भरलेल्या बाजारांमध्ये बकऱ्यांच्या किंमती 10 हजारांपासून थेट 5 लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे अहवाल सांगतात.
इतिहासाचा विचार केला तर 1971 च्या युद्धाच्या काळात पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे 6.18 कोटी होती. आज मात्र ही संख्या सुमारे 25 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे ‘बॉर्डर 2’मधील हा संवाद वास्तवाशी तुलना करता स्पष्टपणे अतिशयोक्तीपूर्ण आणि चित्रपटाच्या नाट्यमय प्रभावासाठी लिहिलेला असल्याचं दिसून येतं.
जगभरात ईद-उल-अधाच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचा बळी दिला जातो. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार दरवर्षी सुमारे 5 कोटी प्राणी—यामध्ये बकऱ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आणि उंट यांचा समावेश या सणादरम्यान कापले जातात.
दरम्यान, ‘बॉर्डर 2’ हा जे. पी. दत्ता दिग्दर्शित 1997 साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. देशभक्ती, भावनिक संवाद आणि मोठ्या पडद्यावरील भव्यतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढवत आहे.




