spot_img

BMC Mayor : महायुतीच्या महापौरांची घोषणा रविवारीनंतर? फडणवीस–शिंदे यांच्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष

spot_img

ठाणे, केडीएमसी, उल्हासनगरमध्ये शिंदे गट मजबूत; मुंबईसह २८ महापालिकांच्या आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाणे, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसणार, हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र महापौरपद कोणाकडे जाणार आणि शपथविधी नेमका कधी होणार, याबाबतची उत्सुकता कायम असून आता यावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीने जिंकलेल्या महापालिकांच्या महापौरांची अधिकृत घोषणा येत्या रविवारनंतरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) सध्या दावोस दौऱ्यावर असून ते २५ जानेवारीला भारतात परतणार आहेत. त्यानंतर फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

सुरुवातीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महापौरपदाच्या वाटपावरून तणाव निर्माण होण्याची चिन्हे होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात सत्तेवर दावा केला होता. मात्र ताज्या राजकीय समीकरणांनुसार एकनाथ शिंदे गटाची ताकद अधिक वाढल्याचं चित्र आहे.

कल्याण–डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ५३ शिवसेना नगरसेवक आणि ५ मनसे नगरसेवकांना एकत्र आणत ५८ जणांचा मजबूत गट उभा केला आहे. यामुळे समान सत्तावाटपाची मागणी करणाऱ्या भाजपवर दबाव वाढला असून, शिंदे गटाचं पारडं जड झालं आहे. ठाणे महानगरपालिकेतही शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, ठाण्यात महापौरपद शिंदे गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

उल्हासनगर आणि कल्याण–डोंबिवली या दोन्ही महापालिकांमध्ये ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने, स्थानिक सत्ताकेंद्र पूर्णपणे महायुतीच्या ताब्यात गेल्याचं चित्र आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठरणार खुला, महिला, अनुसूचित जाती-जमाती किंवा ओबीसी यावर अंतिम उमेदवारांची निवड अवलंबून असेल. आरक्षण स्पष्ट होताच महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री दावोसवरून परतल्यानंतर मुंबईत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत केवळ महापौरपदांच्याच नव्हे, तर महायुतीतील सत्तावाटप आणि समन्वयावरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत फडणवीस आणि शिंदे कोणता सुवर्णमध्य काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ