युट्यूब व्हिडिओत जोडप्याचा प्रामाणिक खुलासा; ‘रिबाउंड रिलेशनशिप’ही यशस्वी होऊ शकते याचं जिवंत उदाहरण
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्या ऐकायला मिळतात, पण काही कथा या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन थेट मनाला भिडतात. अभिनेत्री अर्चना पूरन सिंग आणि अभिनेता परमीत सेठी यांची प्रेमकहाणी त्यापैकीच एक. नुकत्याच त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या जोडप्याने त्यांच्या नात्याच्या सुरुवातीबाबत अतिशय प्रामाणिक आणि धाडसी खुलासा केला आहे.
अर्चना आणि परमीत यांनी कबूल केलं की, त्यांच्या नात्याची सुरुवात एका ‘वन-नाईट स्टँड’पासून झाली होती. मात्र, हीच ओळख पुढे इतकी घट्ट झाली की आज ते जवळपास ३८ वर्षांपासून एकत्र आयुष्य जगत आहेत.
दोघांची पहिली भेट १९८८ साली एका मित्राच्या घरी झाली. मित्रमंडळींसोबत गप्पा, हशा आणि सहज संवादातून त्यांची जवळीक वाढू लागली. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी परमीतचा फोन येईल की नाही, याची अर्चनाला उत्सुकता होती. पण परमीतने तिला फोन केला आणि तिथून त्यांच्या नात्याची खरी सुरुवात झाली. हळूहळू फोनवरच्या गप्पा वाढल्या आणि एकमेकांशिवाय राहणं कठीण होऊ लागलं.
त्या काळात दोघांच्याही आयुष्यातील एक समान धागा होता ब्रेकअप. अर्चनाने नुकतंच तिचं जुनं नातं संपवलं होतं आणि परमीतही मागील रिलेशनशिपमधून बाहेर येत होता. दोघेही ‘रिबाउंड फेज’मध्ये होते. यावर अर्चना म्हणाली, “लोक म्हणतात रिबाउंड रिलेशनशिप टिकत नाहीत, पण आम्ही त्याला अपवाद आहोत.”
त्यावेळी अर्चना जलवा’ (१९८७) या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर होती. परमीतने स्वतः मान्य केलं की, ती खूप सुंदर, आत्मविश्वासू आणि यशस्वी होती. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो होतो. मला वाटायचं, माझ्यासारख्या मुलाला ती कधीच होकार देणार नाही.”
नात्याच्या सुरुवातीच्या काळातील एक गंमतीशीर पण धक्कादायक किस्साही अर्चनाने शेअर केला. एकदा परमीत प्रेम व्यक्त करत असताना चुकून त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडचं नाव घेतलं होतं. अर्चना सांगते, “तो माझ्या किचनमध्ये उभा होता आणि म्हणाला – ‘परमीत आणि अमुक-तमुकची जोडी कायम राहील!’ त्या वाक्यात माझं नावच नव्हतं.”* हा किस्सा ऐकून परमीतही थक्क झाला, कारण त्याला ही घटना अजिबात आठवत नव्हती.




