रियाधमधील पुरस्कार सोहळ्यातील क्षणावरून तुर्की अभिनेत्री Hande Erçel च्या स्टोरीने पेटवला नवा वाद
बॉलिवूडचा रोमॅन्स किंग शाहरुख खान जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. वयाच्या 60 व्या वर्षानंतरही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. मात्र नुकत्याच एका घटनेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका अभिनेत्रीने शाहरुख खानला थेट “कौन है ये अंकल?” असे म्हणत पोस्ट केल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे चाहते संतप्त झाले आहेत.
ही घटना जॉय अवॉर्ड्स 2026 दरम्यान रियाधमध्ये घडली. या सोहळ्यात शाहरुख खानसोबत इजिप्शियन अभिनेत्री अमीना खलील स्टेजवर दिसली, तर तुर्की अभिनेत्री Hande Erçel मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर सोशल मीडियावर Hande ही शाहरुखची फॅन असल्याची चर्चा सुरू झाली.
या चर्चेला उत्तर देताना Hande Erçel हिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपण शाहरुखची चाहती नसल्याचे स्पष्ट केले. तिने सांगितले की ती शाहरुखचा नव्हे, तर तिची मैत्रीण अमीना हिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. मात्र याच स्टोरीमध्ये शाहरुखचा फोटो शेअर करत “हे काका कोण आहेत?” असे शब्द वापरल्याचा दावा समोर आला. काही वेळातच ही स्टोरी व्हायरल झाली आणि नंतर ती डिलीट करण्यात आली.
या प्रकारानंतर किंग खानचे चाहते संतापले असून अनेकांनी ही पोस्ट बनावट असल्याचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या सुपरस्टारबद्दल अशा प्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, Hande Erçel हिने याआधी बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटात तिच्या सहभागाबाबतही चर्चा झाली होती. तसेच आमिर खान आणि हृतिक रोशनसोबत काम करण्याची इच्छा तिने उघडपणे सांगितली होती. त्यामुळे “बॉलिवूडमध्ये काम करायची इच्छा असताना शाहरुख खानला ओळखत नाही, हे कसं शक्य आहे?” असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून सत्य काय आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.




