भारतीय जनता पक्षाला गेली एक वर्ष पुर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष नसल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. अशातच आता जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्यानंतर आता भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एका तरुण चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. त्यांचं नाव आहे नितीन नबीन (Nitin Nabin). ते भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष होणं ही काही साधी गोष्ट नाही. पण हे नितीन नबीन नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय? आणि आगामी 2029 च्या लोकसभा व त्याआधी होणाऱ्या काही महत्वाच्या राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपने त्यांच्यावरच हा विश्वास का दाखवला? नितीन नबीन यांच्याबद्दलची ‘ए टू झेड’ माहिती जाणून घेऊयात
नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. ते एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट माइकल हायस्कूलमधून झाले. 1996 साली त्यांनी 10 वी तर 1998 मध्ये नवी दिल्लीतील CSKM पब्लिक स्कूलमधून 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी पाटणा पश्चिम मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून काम पाहिलं होतं. वडिलांच्या निधनानंतर 2006 मध्ये नितीन नबीन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. नितीन नबीन यांचा अनुभव हा केवळ बिहारपुरता मर्यादित नाही, तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही स्वतःची सिद्धता केली आहे.
नितीन नबीन यांनी 2006 च्या बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि नुकत्याच झालेल्या 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ते बांकीपूर मतदारसंघातून सलग निवडून आले आहेत. बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये त्यांनी रस्ते विकास, नगरविकास आणि गृहनिर्माण तसंच कायदा मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. ते ‘भारतीय जनता युवा मोर्चा’चे राष्ट्रीय सरचिटणीस राहिले आहेत. याशिवाय सिक्कीम आणि छत्तीसगड राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत मोलाची भूमिका बजावली आहे. विशेषतः छत्तीसगडमध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून केलेली रणनीती महत्त्वाची मानली जाते.
भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेते असताना नबीन यांचीच निवड का झाली? याची काही महत्वाची कारणे आहेत. भाजपने नेहमीच तरुणांना प्राधान्य दिलं आहे. 45 वर्षांचे नबीन हे पक्षाच्या आगामी 20-25 वर्षांच्या रणनीतीचा भाग आहेत. नबीन हे कायस्थ समाजातून येतात. बिहार आणि उत्तर भारतात हा समाज भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. हा समाज राजकीयदृष्ट्या तसा सक्रीय नाही व तो न्यूट्रल मानला जातो. नीतिन नबीन यांना अध्यक्ष करून भाजपने एक मोठा सामाजिक संदेश दिला आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि बिहारमधील संघटनात्मक बांधणी यामुळे ते प्रधानमंत्री मोदी (Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या विश्वासातील नेते बनले आहेत.
नितीन नबीन यांच्या नियुक्तीचा आगामी राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मामले जात आहे. देशातील तरुण मतदारांशी संवाद साधण्यासाठी नबीन यांचा उपयोग होईल, अशी पक्षाची आशा आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्ष संघटनेला नवीन ऊर्जा देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. याशिवाय बिहारमधील नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष केल्यामुळे गाय पट्ट्यात भाजप आपली पकड अधिक घट्ट करू इच्छित आहे. नबीन यांना जरी अध्यक्षपद मिळालं असलं, तरी त्यांच्यासमोर काही मोठी आव्हानंही आहेत. यामध्ये विविध राज्यांतील अंतर्गत गटबाजी रोखणे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा सामना करण्यासाठी नवीन रणनीती आखणे. आणि आगामी काही राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकून देणे, ही मोठी आव्हाणं आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, नितीन नबीन यांची निवड हा भाजपचा एक मास्टरस्ट्रोक आहे का, यावर आता चर्चा सुरू झालीय. ज्या पक्षाने ‘बूथ प्रमुख’ ते ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ असा प्रवास करण्याची संधी दिली, त्याच पक्षात आता 5 वेळा आमदार राहिलेल्या तरुण नेत्याला सर्वोच्च पद मिळालं आहे. आता नबीन यांचा हा कार्यकाळ भाजपला कोणत्या उंचीवर नेतो, हे पाहणं रंजक ठरेल. नितीन नबीन भाजपला पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकतील का? हे पाहणंदेखील तितकच महत्वाचं असणार आहे.




