अपघातात रिक्षाचालक व प्रवासी जखमी, उपचार खर्चासाठी कुटुंबाची मदतीची मागणी
मुंबईच्या जुहू परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक अपघात घडला. अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनामागे असलेल्या ऑटो रिक्षाला भरधाव मर्सिडीज कारने धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा अक्षय कुमारच्या सुरक्षा गाडीवर आदळली. या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीर याने माध्यमांशी बोलताना उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. “माझ्या भावाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत आणि रिक्षाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, एवढीच आमची मागणी आहे,” असं त्याने सांगितलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मर्सिडीज चालक राधेश्याम राय याच्याविरुद्ध वेगात आणि बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ऑटो रिक्षा आणि मर्सिडीज कार दोन्ही जप्त करण्यात आल्या आहेत. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतेही मादक पदार्थ सेवन केल्याचे आढळले नाही. त्यामुळे त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातात अक्षय कुमार आणि त्यांचे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, मर्सिडीजचा वेग अधिक असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे अक्षय कुमार थोडक्यात बचावले असल्याचं बोललं जात आहे.




