महापालिका-नगरपरिषद निकालांनंतर स्पष्ट चित्र; भाजप राज्यातील नंबर 1 पक्ष, फडणवीस ठरले रणनितीचे शिल्पकार
मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. धुरंधर म्हणजे आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारा व्यक्ती. हाच शब्द आज महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांसाठी वापरला जात असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या अभूतपूर्व यशाने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. याआधी नगरपरिषद निवडणुकांमध्येही भाजपने वर्चस्व सिद्ध केलं होतं. आता महापालिका निवडणुकांमधील विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि ताकदवान पक्ष ठरला आहे.
29 पैकी तब्बल 25 महापालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवत आपला झेंडा फडकावला आहे. मुंबईसारख्या प्रतिष्ठेच्या महापालिकेसह पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांवरही भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सर्वाधिक नगराध्यक्ष आणि महापालिकांचा विक्रम भाजपच्या नावावर जमा झाला आहे.
केडर बेस असलेल्या भाजपने सत्तेचा वापर संघटन वाढीसाठी प्रभावीपणे केल्याचं या निकालांतून स्पष्ट होत आहे. जरी पक्ष सामूहिक नेतृत्वाला महत्त्व देत असला तरी या यशामागे देवेंद्र फडणवीस हे प्रमुख रणनितीकार असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे.
2014 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस यांनी भाजपचा राज्यभर विस्तार केला. 2019 मध्ये सत्ता हातातून गेली असली तरी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा भाजपने सत्ता स्थापन केली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
गेल्या 11 वर्षांत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक बनले आहेत. ‘दिल्लीमध्ये नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ ही ओळ आता राजकीय चर्चेचा भाग बनली आहे. मात्र यशाचं श्रेय घेताना फडणवीस नेहमीच पक्ष संघटनेचं योगदान पुढे करतात.
आज भाजपने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक धुरंधर नेता घडवला आहे. आता हाच ‘फडणवीस पॅटर्न’ इतर राज्यांमध्येही राबवला जाणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.




