मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान सूरू आहे. या मतदाना दरम्यान दिवसभर राड्याच्या, हाणामारीच्या आणि वादावादीच्या घटना घडल्या आहेत.त्यात आता मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 2 म्हणजेच भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रभागात भाजप मनसे आमने सामने आल्याची घटना घडली आहे. तसेच ठाकरे मनसेच्या भगव्या गार्डवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांनी भगव्या गार्डना ताब्यात घेतले होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण पसरले आहे.
भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्र शोधण्यात होणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थेतील गोंधळामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. याचदरम्यान मतदान केंद्राबाहेर मनसे आणि भाजप यांच्यात वाद उफाळून आल्याची घटना घडली आहे. मनसे-शिवसेनेचे भगवे गार्ड मतदान केंद्राबाहेर राडा घालत असल्याचा आरोप करण्यात आला. हा वाद भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकच तीव्र झाला त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन एमएचबी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मनसेचे भगवे गार्ड यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




