spot_img

BMC Election 2026 : महानगरपालिका मतदानात गोंधळ! ईव्हीएम बिघाड, मतदार यादीतील त्रुटींमुळे पारदर्शकतेवर सवाल

spot_img

शाई पुसली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; निवडणूक आयोगावर विरोधकांची जोरदार टीका

राज्यभरात आज सकाळपासून महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून अनेक शहरांमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरू असले तरी, सुरुवातीच्या काही तासांतच विविध ठिकाणी अडचणी आणि गोंधळाचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने मतदान प्रक्रियेला उशीर झाला. तर काही ठिकाणी मतदार यादीतून नावे गायब असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या त्रुटींमुळे काही ठिकाणी मतदार आणि प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकारांमुळे दुबार मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, या त्रुटींचे प्रत्यक्ष पुरावे देत काही राजकीय नेत्यांनी स्वतः मतदान केंद्रांवरील परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई सहजपणे पुसता येत असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांच्या पत्नीच्या बोटावरील शाई नेलपॉलिश रिमूव्हरच्या मदतीने कशी काढता येते, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका होत असून, मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. आता निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन काय पावले उचलतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ