spot_img

PMC Eelction : पुणे महापालिका निवडणुकीत पैसा, डान्सबार आणि सत्ता… धंगेकरांचे महायुतीवर घणाघाती आरोप

spot_img

भ्रष्टाचाराच्या पैशांचा डान्सबारमध्ये उधळपट्टीचा दावा; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांवर थेट निशाणा

पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, मतदानाच्या उंबरठ्यावर पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे आरोप समोर आले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर, विशेषतः भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) वर गंभीर आरोपांची झोड उठवली आहे.

पुणेकरांच्या कराच्या पैशातून महापालिकेची तिजोरी लुटली गेली असून हाच पैसा डान्सबारमध्ये उधळला जात असल्याचा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला. पैसा, सत्ता आणि डान्सबार या त्रिसूत्रीवर पुण्याचे राजकारण चालत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

“लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करण्याच्या गप्पा मारल्या जातात, पण त्यांच्याच पक्षातील लोक डान्सबारमध्ये महिलांवर नोटा उडवताना दिसतात. हा कसला महिलांचा सन्मान?” असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला. डान्सबारमध्ये पैसे उधळून ‘लखपती दीदी’ बनवत आहात का, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील संस्कृतीचे गोडवे गातात, मग त्यांच्या पक्षात अशी चारित्र्यहीन मंडळी कशी काय वाढत आहेत, असा सवालही धंगेकरांनी केला. अशा लोकांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपने उमेदवारी देताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळा कोटा ठेवला आहे का, असा थेट आरोप करत धंगेकर म्हणाले की, जर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबारमध्ये उडवत असतील, तर उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? हे लोक वरून गोड बोलतात, पण आतून पुणेकरांची तिजोरी रिकामी करण्याचे काम करत आहेत.

या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ या दाव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडीओ शेअर करत हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघातील आमदारांचे आर्थिक व्यवहार पाहतो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) याकडे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्याच्या राजकीय संस्कृतीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी पुणेकरांनी मतदानाच्या माध्यमातून ‘तिसरा डोळा’ उघडावा, असे आवाहन धंगेकर यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ